विशाखापट्टणम – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात दिल्लीने हैदराबादचा पराभव करत प्रथम प्ले ऑफ मधील सामना जिंकला. मात्र, या सामन्यातील पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने पराभवाचे खापर संघातील गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवर फोडले असुन त्यांनी संपूर्ण मोसमात खराब कामगिरी केल्याने आम्ही यंदा सर्वांना निराश केले असेही त्याने यावेळी सांगितले.
सामन्यानंतर बोलताना केन विल्यम्सन म्हणाला, झेल पकडणे, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या आघाड्यांवर केलेली खराब कामगिरी यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला विशाखापट्टणमची खेळपट्टी ही अटीतटीच्या सामन्यांसाठी ओळखली जाते. आम्ही जितकी धावसंख्या उभारली होती, ती धावसंख्या नक्कीच स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होती. धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्ले च्या षटकांनंतर फलंदाजांना चेंडू टोलवणे कठीण जाईल याची मला चांगलीच कल्पना होती. काही सामन्यात आपला संघ चांगल्या परिस्थितीत असतो, पण सामन्याचा निकाल आपल्याला हवा तसा लागत नाही.