सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने होणार जमीन मोजणी
पुणे – राज्यातील सर्व गावांमधील गावठाणांची मोजणी करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने ही मोजणी करण्यात येणार असून या कामासाठी शासनाने भूमि अभिलेख विभागाला चार कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गावठाण मोजणीच्या कामाला वेग येणार आहे.
राज्य शासनाचा भूमिअभिलेख विभाग काळानुसार कात टाकत असून जमीन मोजणीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. सध्यस्थितीत जमिन मोजणीसाठी ईटीएस मशीनचा वापर करण्यात येत असून या मशीनमुळेही जमीन मोजणी लवकर होण्यास मदत होते. मात्र आता भूमि अभिलेख विभाग याही पुढे जाऊन ड्रोनच्या सहाय्याने जमिनींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रोनद्वारे मोजणीमध्ये खर्चातही 50 टक्के बचत होते. ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करण्यासाठी एक दिवसाचा वेळ लागतो. 15 ते 30 दिवसांचे काम ड्रोन कॅमेऱ्यामुळे होत असल्याने तसेच मोजणीमध्ये अचूकता येत असल्याने भूमि अभिलेख विभागाने या नविन तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरविले आहे.
गावठाणांमधील मालमत्तांचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करणे याकामासाठी या आधी 2 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असून ड्रोन खरेदी करण्यासाठी शासनाने तातडीने आणखी चार कोटींचा निधी मंजूर केला आहे.