पुणे – महापालिकेकडून शहरातील आपत्ती व्यवस्थापन तसेच पूर व्यवस्थापनासाठी शहराचा ट्वीन सिटी-३ डी माॅडेल तयार केले जाणार आहे. या कामा सोबतच आता महापालिकेकडून शहरातील सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
यात इमारतींची उंची आणि बांधकामाची मोजणी केली जाणार आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदी आणि या माहितीची सांंगड घालून संबंधित मिळकतींची कर आकारणी झाली आहे की नाही अथवा संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेले आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात पूरस्थितीच्या घटना वाढल्या आहेत तसेच भविष्यात एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पालिकेकडे त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा असली तरी संपूर्ण शहराचे कधीही मॅपिंग झालेले नाही.
त्यामुळे, केंद्रशासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पालिकेस शहरी पूर व्यवस्थापनासाठी देण्यात आलेल्या निधीतून पालिकेकडून शहराचे ट्वीन सिटी-३ डी माॅडेल तयार केले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने प्राधिकरणास दिल्यानंतर त्यांनी सर्वकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) मागविला आहे. तो पालिकेने तयार केला असून लवकरच तो केंद्रशासनास पाठविण्यात येणार आहे.
या आधीही केले होते सर्वेक्षण…
महापालिकेकडून २०१४ मध्ये शहरात जीआयएस मॅपिंगद्वारे मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून शहराच्या मिळकतींची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. या पाहणीत ज्या मिळकतींचा व्यावसायिक वापर केला जात आहे.
तसेच ज्या ठिकाणी भाडेकरू राहत आहेत त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यानंतर पालिकेने ९७ हजार मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द केली होती, त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर आता पालिकाना नव्याने ड्रोन द्वारे सर्वेक्षण करणार आहे.