नाशिक – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी संशयास्पदपणे ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पवन राजेश सोनी (29) असे त्याचे नाव आहे. पवन फोटोग्राफर असून, लग्नसराईत शूटिंग करताना ड्रोन चुकून फार्महाऊस भागात गेल्याचा दावा त्याने केला आहे.
छगन भुजबळ मराठा आंदोलनामुळे वादात अडकलेत. त्यातच गत शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या भुजबळ फार्म निवासस्थानावर एका ड्रोनने घिरट्या घातल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी याचा तपास केला असता हे ड्रोन पवन राजेश सोनी यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून ड्रोन चुकीने भुजबळ फार्म परिसरात गेल्याचे स्पष्ट झाले.