नाशिक – मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भुजबळ फार्म (Bhujbal Farm) या निवासस्थानावर ड्रोन (Drone) कॅमेरा फिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ड्रोन उडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही टेहळणी म्हणजे रेकी असण्याचा संशय असून, यामुळे पोलिसांनी येथील बंदोबस्तात वाढ केली आहे.
भुजबळ फार्मचे सुरक्षा अधिकारी दीपक म्हस्के यांनी अंबड पोलिस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी भुजबळ फार्मला भेट घेऊन स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर येथील बंदोबस्त वाढवण्याचे आदेश दिले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ड्रोन कोणी आणि का उडविला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ड्रोन उडविण्यासाठी कोणी परवानगी घेतली होती का? याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. छगन भुजबळ यांचे नाव नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून वातावरण तापले असतानाच भुजबळ यांच्या बंगल्यावर ड्रोन उडाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून नाशिकच्या जागेसाठी जोर लावला जात आहे. आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Lok Sabha Constituency) जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळांच्या उमेदवारीबाबत उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे.