पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधण्यासाठी राज्य शासनातर्फे 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र दहा महिने उलटून गेल्यानंतरही ही निधी लालफितीत अडकला आहे. राज्य सरकारने नागपूर विद्यापीठाला शताब्दी वर्षाच्या निमित्ताने क्रीडा संकुलासाठी 20 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्षात पर्दापण करीत असताना क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या निधीकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे.
पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडा संकुल 28 एकर परिसरात उभारले असून, यात विविध खेळांची मैदाने तयार केली आहेत. या संकुलाचे उद्घाटन तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 5 जून 2022 रोजी झाले. या संकुलात जलतरण तलाव नाही. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, याकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष वेधले. त्यानंतर पवार यांनी तलावासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, विद्यापीठाने तातडीने जलतरण तलावासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली; परंतु दहा महिन्यांनंतरही त्यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही.
सत्तांतरामुळे जलतरण तलाव “पाण्यात’
दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर घडले. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. या सर्व घडामोडीत जलतरणाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले. आता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे जलतरण तलाव बांधण्यासाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल
विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस, कुस्ती, शूटिंग, जिम्नॅशियम, ऍथलेटिक्स असे मैदानी खेळ खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. हॉकी व क्रिकेटच्या मैदानाचे काम प्रगतीपथावर आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कमीत कमी शुल्कात येथे सराव करता यावा, या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विद्यापीठाने जलतरण तलावाच्या निधीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हा निधी प्राप्त झाल्यास जलतरणपटू विद्यार्थ्यांना स्पर्धांची तयारी करता येईल. त्यातून चांगले खेळाडू तयार होतील. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध होऊ शकेल.
– डॉ. दीपक माने, संचालक, शारीरिक शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ