पुणे – शहरातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेल्या सिंहगड रस्त्याला कालव्यावरील रस्त्याच्या सोबतच आता आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. महापालिकेकडून गंगा भाग्योदय सोसायटीच्या समोरील चौकातून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे 800 मीटर लांबीचा हा रस्ता असून वडगाव, धायरी तसेच महामार्गावरून सिंहगड रस्त्यावरून पुढे संतोष हॉल आणि सनसिटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता उपयोगी ठरणार आहे.
सध्या वरील भागातून सनसिटीकडे जाणाऱ्या वाहनांना गंगा भाग्योदय चौक, माणिक बाग आणि पुढे संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जावे लागते. तर सनसिटीमधील नागरिकांना वडगाव अथवा धायरीकडे जाण्यासाठी संतोष हॉल चौकातून हिंगणे चौक तसेच पुढे धायरी रस्त्याने जावे लागते. मात्र, या रस्त्यामुळे नवा पर्याय खुला होणार असून, सिंहगड रस्त्यावरील कोंडी आणखी कमी होणार आहे. महापालिका आयुक्तांनी मिसिंग प्रकल्पांतर्गत या रस्त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
असा आहे रस्ता
हा रस्ता सुमार 30 मीटर रुंदीचा आहे. गंगा भाग्योदय सोसायटीच्या चौकातून इंडियन ह्यूम पाइप कंपनीच्या जागेतून महापालिकेने हा प्रस्तावित केला होता. मात्र, कंपनीकडून जागा महापालिकेच्या ताब्यात मिळालेली नव्हती. सुमारे 800 मीटर लांबीच्या या रस्त्यावर 320 मीटर रस्ता कंपनीच्या आवारातून जात होता. ही जागा ताब्यात घेण्याची महापालिकेची प्रक्रिया सुरू असून, कंपनीने तूर्तास महापालिकेस नऊ मीटर रस्त्यासाठी जागा दिली आहे. तसेच उर्वरित जागा लवकरच दिली जाणार आहे. तर सनसिटीच्या बाजूने सुमारे 700 मीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली असून, त्या ठिकाणी पालिकेने आधीच काम सुरू केले आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत उर्वरित जागा ताब्यात घेऊन महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे.
भविष्यात कर्वेनगरला जोडणार
हा रस्ता सनसिटी मंडईपासून पुढे थेट कर्वेनगरला जोडला जाणार आहे. सनसिटी मंडईपासून पुढे कर्वेनगरकडे जाणाऱ्या मुठा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने 28 कोटींची निविदा काढून कार्यादेशही दिले होते. मात्र, काम देण्यात आलेली कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने पालिकेने फेर निविदा काढल्या असून, त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील महिन्याभरात हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. – हा रस्ता झाल्यास कात्रज, आंबेगाव तसेच वडगाव आणि धायरीकडून कर्वेनगरकडे जाणाऱ्या नागरिकांचे जवळपास पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन किलोमीटरवर येणार आहे. हा रस्ता झाल्याने हे अंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटांत पार करता येणार आहे.