मुंबई – ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ या ब्रीदवाक्याप्राणे खार पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसाने वृद्ध महिलेची केलेल्या मदतीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरगुती वादातून सुनेने सासूला प्लास्टिकच्या काठीने मारहाण केली होती. या घटनेत वृद्ध सासू जखमी झाल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच खार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी महिला पोलीसाने जखमी वृद्ध महिलेला चौथ्या मजल्यावरून कडेवर खाली आणले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका सुनेने घरगुती वादातून 72 वर्षीय वृद्ध सासूनला मारहाण केली. याबाबत पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली. त्यांनतर कंट्रोल रूमकडून खार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक घोगरे, पोलिस शिपाई घारगे, महिला पोलिस शिपाई म्हात्रे यांना याबाबतची माहिती मिळाली. माहिती मिळताच हे सर्व जण घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी वृद्ध महिला एकट्या आढळून आल्या. सुनेच्या मारहाणीत त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना चालता येत नव्हते. त्यामुळे म्हात्रे यांनी त्यांना कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले आणि रुग्णालयात भरती केले.
दरम्यान, पोलिसांनी वृद्ध सासूला मारहाण करणाऱ्या सुनेला अटक केली आहे. तपासादरम्यान सून आणि सासू यांच्यात काही शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सासूला प्लास्टिकच्या काठीने मारहाण करण्यात आली. त्यात तिला किरकोळ दुखापत झाली आहे. मारहाणीचे नेमके कारण काय होते? याचा तपास पोलीस करत आहेत. महिला पोलीसाने जखमी वृद्ध महिलेला कडेवर उचलून खाली आणून रुग्णालयात दाखल केल्याने म्हात्रे यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.