सातारा – गेल्या काही दिवसांमध्ये लावणी कलावंत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचे प्रमाण वाढले आहे. विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून गौतमीचा कार्यक्रम ठेवला जात आहे. आता तर बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. जावळी तालुक्यातील खर्शी कुडाळ येथे 11 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती गौतमीने एक व्हिडीओ शेअर करून दिली आहे.
गौतमीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हंटले आहे की, जावळी तालुक्यातील खर्शी कुडाळ येथे ११ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता गौतमीचा हा कार्यक्रम होत आहे. प्रसिद्ध गाडा मालक पै. सतिश भोसले यांच्या महाराष्ट्र चॅंपियन अश्विन बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. मी येतेय, तुम्हीही नक्की या.. असं आवाहन गौतमीने चाहत्यांना केले आहे.
प्रसिद्ध गाडा मालक पै. सतिश भोसले यांनी महाराष्ट्र चॅंपियन अश्विन बैलाचा वाढदिवस जंगी करण्याचे ठरवले आहे. कार्यक्रम आकर्षक होण्यासाठी त्यांनी थेट गौतमी पाटीलचाच कार्यक्रम ठेवला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण तिचे चाहते आहेत. लावणी सादर करताना अश्लिल हावभाव केल्यावरून तिच्यावर टीका करण्यात आली होती. लावणीदरम्यान अश्लिल चाळे करतानाचा तिचा एक व्हिडीओ सोसल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. तेव्हापासून ती संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाली आहे. दिवसेंदिवस तिचे चाहते वाढत चालले असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक कपडे बदलतानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती दाखवली होती.