नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकचा आणखी एक महत्त्वाचा दौरा करणार आहेत. मोदी उद्या बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस वे देशाला समर्पित करणार आहेत. 8480 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या 118 किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांवरून केवळ 75 मिनिटांवर येणार आहे. पंतप्रधान मोदी या वर्षी सहाव्यांदा कर्नाटकात जात आहेत. राज्यात एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
एनएच-275 च्या बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागाच्या 6-लेनिंगचा या प्रकल्पात समावेश आहे. 118 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प एकूण 8480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. हा प्रकल्प या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. पंतप्रधान म्हैसूर-खुशालनगर 4-लेन महामार्गाची पायाभरणीही करतील. सुमारे 4130 कोटी रुपये खर्चून 92 किमी पसरलेला हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. कुशलनगरची बेंगळुरूशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल आणि प्रवासाचा वेळ 5 वरून केवळ 2.5 तासांपर्यंत कमी करण्यात मदत करेल.
पंतप्रधान मोदी रविवारी मंड्याला भेट देणार आहेत. दुपारी मंड्यातील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी धारवाडला जाणार आहेत. दुपारी आयआयटी धारवाडला भेट देतील. नंतर हुबळी-धारवाड दरम्यान दोन रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवतील. सध्या कर्नाटकात भाजपच्या चार विजय संकल्प यात्रा सुरू आहेत. त्यांची सांगता 25 मार्चला मोठ्या जाहीर सभेच्या रूपाने होणार आहे. या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा कर्नाटकचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म देखील राष्ट्राला समर्पित करतील. या विक्रमाला नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिली आहे. सुमारे 1507 मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म सुमारे 20 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान होस्पेट-हुबळी-तीनाघाट विभागाचे विद्युतीकरण आणि या प्रदेशात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी होस्पेट स्टेशनचे अपग्रेडेशन समर्पित करतील.