पिंपरी (प्रदीप लोखंडे) – संपूर्ण जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांच्या उपचाराचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयात आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांच्या औषधांची कमतरता असल्याने गरीब रुग्णांचे आर्थिक आणि शारीरिक हाल होत आहेत.
नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मधुमेहावरील 13 लाख औषधांचा तुटवडा आहे. तर उच्च रक्तदाबावरील देखील पुरेशी औषधे नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. गेल्या महिनाभरापासून रुग्ण तक्रारी करत आहेत. शासनाकडूनच कोटा कमी आला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या हाती निराशाच पडत आहे. औषधे कमी पडत असल्याबाबत रुग्णालयाचे प्रमुखच अनभिज्ज्ञ आहेत.
सर्वसामान्य रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार सुधारता सुधारेना असा झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून सुसज्ज रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे. सुविधांचा मात्र बोजवाराच उडाला आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना औषधांचा पुरवठा केला जातो. दरवर्षी मधुमेहाच्या रुग्णांसाठी 43 लाख गोळ्यांची मागणी केली जात आहे. तर उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना महिन्याकाठी सुमारे 1 लाख गोळ्यांचे वाटप केले जात आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात आवश्यक गोळ्यांची मागणी रुग्णालय प्रशासनाकडून राज्य शासनाकडे केली जात आहे.
यंदाच्या वर्षी मधुमेहासाठी 43 लाख गोळ्यांची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाकडून केवळ 30 लाख गोळ्यांचा पुरवठा केला असून 13 गोळ्यांचा तुटवडाच आहे. उच्च रक्तदाबाच्या गोळ्या देखील कमी पडत आहे. या रुग्णालयात पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीणसह संपूर्ण राज्यातून रुग्ण औषधे घेण्यासाठी दाखल होत आहेत. मात्र औषधे न घेताच त्यांना परतावे लागत आहे. यामुळे रुग्ण व रुग्णालय प्रशासनामध्ये वादाचे प्रसंग देखील होत असून रुग्णांमधून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या प्रमूखांना औषधांचा तुटवडा असल्याची माहितीच नाही. संबंधीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो म्हणून त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले.
औषधांचा तुटवडा आहे किंवा नाही या बाबत माझ्याकडे माहिती नाही. आमच्या फार्मासिस्टकडून या बाबत माहिती घेतो.
– डॉ. नागनाथ यल्लमपल्ली, जिल्हा शल्यचिकित्सक, नवी सांगवी जिल्हा सर्वोपचार रुग्णालय.
उच्च रक्तदाबाच्या 43 लाख गोळ्यांची गरज
उच्च रक्तदाबासाठी 7 ते 8 प्रकारच्या गोळ्यांची रुग्णांना आवश्यकता असते. या रुग्णालयांतर्गत संपूर्ण जिल्ह्यासाठी 53 लाख गोळ्यांची दरवर्षी आवश्यकता आहे. मात्र औषधांसाठी रुग्णालयाला दिलेला निधीच कमी पडत आहे. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या केवळ 10 लाख गोळ्याच राज्य शासनाकडून मिळाल्या आहेत. उर्वरीत 43 लाख कमी पडल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
औषधांचा तुटवडा आहे किंवा नाही या बाबत माझ्याकडे माहिती नाही. आमच्या फार्मासिस्टकडून या बाबत माहिती घेतो.
– डॉ. नागनाथ यल्लमपल्ली, जिल्हा शल्यचिकित्सक, नवी सांगवी जिल्हा सर्वोपचार रुग्णालय.