पिंपरी – पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाच्या डीपीआरला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या कामासाठी 1 हजार 206 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाल्यानंतरच निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या मागणीने जोर धरला होता. तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना महामेट्रोला केल्या होत्या. महामेट्रोने सादर केलेल्या डीपीआरला डिसेंबर 2021 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने मान्यता देऊन तो नगरविकास विभागाकडे पाठविला होता. राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या विस्ताराला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, या मार्गाचे शेवटचे स्टेशन निगडी भक्ती-शक्ती चौकात होणार आहे. हा भाग रेडझोनमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे केंद्रीय संरक्षण विभागाच्या परवानगीसाठी हा प्रस्ताव रखडला आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पुणे महामट्रो विस्तारीकरणासाठी 1 हजार 206 कोटींची तरतूद केली आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो या 4.413 कि.मी विस्तारीकरणाचा अपेक्षित खर्च 910 कोटी 18 लाख एवढा आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हिस्सा समाविष्ट असणार आहे.
पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरण करण्यासाठी मनसेच्या वतीने मेट्रो प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील मेट्रोचे अंतिम स्टेशन रेडझोन क्षेत्रात येत असल्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला लवकरच मान्यता मिळवून हे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे आश्वासन मेट्रोकडून देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात देखील या मार्गासाठी विशेष तरतूद केल्यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी भागातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान आहे.
सचिन चिखले , अध्यक्ष – मनसे, पिंपरी-चिंचवड शहर