नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कस्तुपटूंनी लैंगिक अत्याचारासह अनेक आरोप केले होते. याच्या चौकशीसाठी व सिंह यांच्या राजीनाम्यासाठी अव्वल ऑलिंम्पिक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले. तीन दिवस हे आंदोलन सुरु होते. त्यानंतर अखेर ब्रिजभूषण सिंह पदावरून हटविण्यात आले आहे. यानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेतले.
सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यात चौकशी अहवाल देणार आहे. तोपर्यंत हीच समिती कुस्ती संघटनेचे काम बघणार आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण सिंह यांना महासंघाच्या कामांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जोपर्यंत त्यांच्या वरील आरोपांची चौकशी पूर्ण होत तो पर्यंत ते कुस्ती संघटनेच्या कामांपासून दूर राहणार आहेत. दरम्यान, कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाची आज (रविवारी) होणारी AGM बैठक रद्द करण्यात आली आहे. अयोध्येतील हेरिटेज हॉटेलमध्ये सकाळी दहा वाजता ही बैठक होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.