सिंहगडरस्ता -कोयता बाळबून उन्माद करणाऱ्या गुंडांना जीवाची बाजी लावून जेरबंद करणारे सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अक्षय इंगवले व धनंजय पाटील यांचा धायरीकर नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. खडकवासला विधानसभा कॉंग्रेस व धायरी बंधुत्व ग्रुपच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल पुष्पगुच्छ देऊन इंगवले व पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील व बंधुता ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद पोकळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
वडगाव आंबेगाव, सिंहगड कॉलेज भागात दोन गुंड कोयत्याने हल्ला करत होते. परिसरात त्यांनी दहशत पसरवली. दुकाने, वाहनांची तोडफोड करत दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करत होते. हल्ल्यात विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले. त्यावेळी अक्षय इंगवले व धनंजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्राणाची बाजी लावून दोघांना जेरबंद केले. त्यांच्या या कार्याबद्दल श्रीरंग चव्हाण पाटील यांनी अभिनंदन केले. ऋषिकेश पोकळे, राजेश पोकळे, सनी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
गिरीश गुरूनानी यांच्या वतीनेही कृतज्ञता
कोथरूड – धाडसी व कर्तव्यदक्ष पोलीस अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांचा राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी नागरिकांच्या वतीने सत्कार केला. अशा जिगरबाज पोलिसांची समजाला गरज असल्याचे व अशा व्यक्तिमत्त्वांचा आदर करून पोलिसांचा मनोबल वाढवण्याची गरज असल्याचे गुरूनानी यांनी सांगितले. याप्रसंगी प्रकाश नगरे, राजेश बाच्चेवर, नीलेश बच्चेवार व प्रीतम पायगुडी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.