दोहा :– फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील महत्वाच्या लढतीत बलाढ्य स्पेनला जपानकडून 2-1 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अर्थात विजयी जपानसह पराभूत झालेल्या स्पेननेही स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्यात स्पेन सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा केली जात होती मात्र, जपानने सगळ्यांचे आराखडे खोटे ठरवले व आपली गुणवत्ता सिद्ध केली. या सामन्याला सुरुवात झाल्यावर स्टार खेळाडू लगेचच मैदानात न उतरवण्याचा फटका स्पेनला बसला. त्याचाच लाभ घेत जपानने पहिल्या हाफमध्ये बचाव फारसा चांगला केला नाही व त्यावेळी स्पेनच्या अल्वारो मोराटाने 11 व्या मिनिटाला गोल केला व आघाडी मिळवून दिली. मात्र, त्याचा लाभ त्यांना नंतरच्या संपूर्ण खेळात घेता आला नाही.
मोराटा वगळता त्यांच्या प्लेइंग खेळाडूंमध्ये कोणालाही गोल करता आला नाही. जपानने मात्र, दुसरा हाफ सुरु झाल्यावर कात टाकली. त्यांच्या खेळात यापूर्वी कधीही न दिसलेली आक्रमकता जाणवली. त्यांच्या रित्शु डोआन याने 48 व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधून दिली. बरोबरी झाल्यावर स्पेनचे खेळाडू निराश झाले होते व त्यांच्याकडून बचावातही चुका होत होत्या. तसेच त्यांना सातत्याने चेंडूवर ताबाही मिळवता येत नव्हता. यातच आवो तानाकाने 51 व्या मिनिटाला स्पेनचा बचाव पुन्हा भेदला व गोल केला.
#FIFAWorldCup2022 : सौदीवरील विजयानंतरही ‘या’ एका कारणामुळे मेक्सिको स्पर्धेबाहेर
या गोलमुळे जपानने 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र, जपानने बचावात्मक खेळावर भर देत स्पेनला गोलची संधीच मिळणार नाही याची काळजी घेतली. जपानच्या याच प्लॅनमध्ये स्पेनचा संघ फसला व पराभूत झाला. अर्थात गुणतालिकेत सरस गुणांच्या जोरावर त्यांनी जपानसह स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.