पुणे, दि. 27 -देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उपक्रम म्हणून “हर घर ध्यान’ हे अभियान उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत देशभरातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मानसिक स्वास्थ्यासाठी आता आर्ट ऑफ लिव्हिंगकडून ध्यानाचे धडे घ्यावे लागणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आतापर्यंत “हर घर तिरंगा’, “हर घर आयुर्वेद’, आदी विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या “हर घर ध्यान’ अभियानाची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परिपत्रकाद्वारे दिली. या अंतर्गत ध्यान आणि मानसिक स्वास्थ्याबाबत तोंडओळख करून देणारा एक तासाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगमधील प्रशिक्षकांनी तयार केला आहे.
अभ्यासक्रमाची विनामूल्य सत्रे संस्थांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज भरावा लागणार आहे.