पुणे – पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते, हे सर्वश्रुतच आहे; परंतु करोनासारख्या आपत्कालीन स्थितीमुळे गेल्या तीन वर्षांपासून या क्षेत्राला आलेली मरगळ आता दूर झाली आहे. गेल्या ऑगस्टपासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. ही रसिकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक नाट्यस्पर्धांनाही सुरुवात झाली आहे.
पुरुषोत्तम करंडकाची सुरुवात तर जोरदार झाली आहेच; चांगल्या संहिता येत नसल्याबाबत खंतही व्यक्त करून झाली आहे. याशिवाय राज्य नाट्य स्पर्धांनाही धुमधडाक्यात सुरुवात झाली. नाट्यगृहातील व्यवस्थेची वाढलेल्या दरामुळे ही स्पर्धा सध्या गाजत आहे. याशिवाय बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, संस्कृत नाट्य, एकांकिका स्पर्धा यांनाही आता सुरुवात झाली आहे. याशिवाय अनेक गाजलेल्या नाट्यकलावंतांच्या आणि कलाकारांच्या नावाने सुरू असलेल्या स्पर्धाही झाल्या आणि होत आहेत. यामध्ये विनोदोत्तम स्पर्धा आणि सतीश तारे यांच्या नावाने स्कीट स्पर्धा यांचा समावेश आहे.
याशिवाय नाटक आणि गायन या शिवाय वादनामध्येही काही वर्षांतच आपले स्वतंत्र स्थान मिळवलेल्या “तालचक्र’ नेही यंदा रसिकांची वादन ऐकण्याची झिंग भागवली आहे. डिसेंबर महिना आला की सगळे सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहात असतात. यंदा हा महोत्सव 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. वसंतोत्सव आणि स्वरझंकार महोत्सव अशा विविध महोत्सवही होत आहेत.
गोकुळाष्टमीपासून सुरू झालेल्या या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद सण समारंभ, संगीत-नाट्यमेळे, या माध्यमातून पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे.