पुणे -विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळांचीही गोडी निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीने राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने डिसेंबरमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाकडून प्राधान्य देण्यात येणार असून, खेळांडूना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे शाळा, महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली होती. ऑनलाइन शिक्षणालाच प्राधान्य देण्यात आले होते. करोनाचे संकट आटोक्यात आल्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरू झाले असून, विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेले आहेत. करोनामुळे मागील काही कालावधीत क्रीडा स्पर्धाही झाल्या नव्हत्या. यामुळे खेळाडुंच्या गुणांना फारसा वावच मिळाला नव्हता. आता क्रीडा सप्ताहाच्या माध्यमातून खेळाडुंमध्ये उत्साह निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यात विविध क्रीडा विषयक उपक्रम, स्पर्धा, खेळांडुंचा सत्कार, चचासत्रे, प्रदर्शने यांचा समावेश असणार आहे. केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.
मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या कार्यक्रमाचे, व्याख्यानाचे आयोजन केले जाते. क्रीडा विषयक शास्त्रोक्त माहिती, क्रीडा विषयक उपक्रम, रोडरेस, सायकल शर्यतीही घेण्यात येतात. राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह या बाबींकरिता शासनाच्या समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागामार्फत 31 जुलै 1997 च्या निर्णयाद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत असते.
आता क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता दहा हजार रुपये प्रमाणे सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता एकूण 3 लाख 60 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यताही मिळालेली आहे. संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी तर क्रीडा आयुक्तांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. शासनाच्या अटीनुसारच निधी खर्च करावा लागणार आहे.