बारामती – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नेहमीच मजबूत पकड आहे. याची प्रचिती वारंवार येते. पवार यांची त्यासाठी असणारी कार्यपद्धती बुधवारी (दि.23) झालेल्या एका घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.अपघातात गंभीर जखमी कार्यकर्त्याला पाहून एकाने थेट अजित पवार यांना मदत मागितली. पवार यांनी देखील तातडीने जखमीला मदत करीत उपचार मिळवून दिले. त्यामुळे मोकाशी कुटुंबाला दिलासा मिळाला.
कटफळ (ता. बारामती) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते तानाजी पांडुरंग मोकाशी हे बुधवारी (दि 23) शिखर- शिंगणापूरवरून घरी परतीच्या वाटेवर होते. यावेळी मेखळी मार्गावर डोर्लेवाडी फाट्यानजिक टॅंकरने अचानक वळण घेतले.त्यामुळे मोकाशी यांच्या दुचाकीची टॅंकरला धडक लागून अपघात झाला. अपघातात मोकाशी यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. ही घटना घडल्यावर एकाने थेट अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. तसेच अपघाताची माहिती दिली. पवार यांनीही तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना त्याच्या उपचारासाठी आवश्यक मदत करण्याची सूचना केली. त्यानंतर देखील ते थांबले नाहीत. प्रत्येक तासाला त्यांनी कार्यकर्त्याच्या प्रकृतीची विचारपूस करीत माहिती घेतली. डॉक्टरांना सूचना देत त्याच्यावर आवश्यक उपचार करण्याबाबत चर्चा केली. अजितदादांच्या सामाजिक बांधिलकीची सर्वत्र चर्चा होती.