पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) -दीपोत्सवातील महत्त्वाचा सण असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजन सोमवारी (दि. 24) असल्याने रविवारी विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी पिंपरी मार्केट, चिंचवड यासह उपनगरांच्या बाजारामंध्ये मोठी गर्दी केली होती. पदपथावर विक्रेत्यांची संख्याही मोठी होती. गेल्या काही वर्षामध्ये नागरिकांकडून स्थानिक विक्रेत्यांना विशेषतः पथारीवाल्यांकडून खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने त्यांची ही दिवाळी यंदा गोड होत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आर्थिक उलाढालीच्या रुपाने लक्ष्मीची पाऊले घरोघरी पडत असल्याचे दृश्य आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात दिवाळीसाठी गर्दी होत होती. परंतु सातत्याने येत असलेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. परंतु आता दिवाळीस प्रारंभ झाल्यानंतर मात्र पावसाने काहिसी विश्रांती घेत नागरिकांसह विक्रेत्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. शनिवारी चांगले ऊन पडले होते आणि पावसाचे दिवसभर कोणतेही लक्षण नव्हते यामुळे देखील बाजारात चांगलीच गर्दी पहावयास मिळाली.
यात लक्ष्मी (केरसुणी), लाह्या, बत्ताशी, पणती, कलर रांगोळी, लक्ष्मी पट्टी, स्टीकर, किल्लावरील सैनिक, वेगवेगळी चित्रे, बोलके इ. साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून लक्ष्मीपूजनानिमित्त कीर्द, खतावण्यांचे पूजन करण्यात येते.