पुणे, दि. 23 -गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न होत आहेत. या अनुषंगाने पुणे-नाशिक दरम्यान 180 किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून पुणे ते नाशिक हे अंतर केवळ दोन तासात पार करणे शक्य होणार असून, त्याकरिता एमएसआरडीसी सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. या प्रकल्पाची सुसाध्यत तपासणी आणि प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याकरीता सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एमएसआरडीसीने निविदा काढल्या आहेत.
रेल्वेकडून पुणे-नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे. याच मार्गाला समांतर या महामार्गाची उभारणी करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी म्हटले आहे. दरम्यान पुणे-नाशिक या दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन लेनचा अवलंब केला जाणार असून पुणे रिंगरोड येथून या मार्गाची सुरुवात होऊन नाशिक येथे सुरत ते चेन्नईदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड कॉरिडोरला तो जोडण्याचे नियोजन आहे .
सद्यस्थितीत पुणे ते नाशिक प्रवासासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या उभारणीनंतर हे अंतर दोन तासात पार करता येणार आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांची नाराजी
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गासाठी भूसंपादन केल्यास शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करून या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांच्या मते पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे भूसंपादन सुरू आहे. त्याचवेळी नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू आहे. यासाठी भूसंपादनाचे राजगुरुनगर ते सिन्नर या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे औद्योगिक द्रुतगती मार्गाची आवश्यकता नाही.
औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या या महामार्गाचा सुसाध्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल वर्षभरात प्राप्त होईल.
– अनिलकुमार गायकवाड
सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी