मुंबई : आर्थिक व्यवहाराप्रकरणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील आणखी एका नेत्याचा पाय खोलात गेला आहे. सिंधुदुर्गमधील उद्धव ठाकरेंच्या गोटातील आमदार वैभव नाईक यांची एसीबीने सखोल चौकशी केलीअसल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास अर्धा तास एसीबीने चौकशी केली. त्यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांचा वेळ कालावधी देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडून चौकशी करण्यात आली. साधरणपणे अर्धा तास वैभव नाईक यांची चौकशी करण्यात आली. एसीबीने वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पनाची चौकशी केली. त्याशिया याचा तपशील देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आठ दिवसांत सर्व माहिती देण्याचे आदेश एसीबीने वैभव नाईक यांना दिले आहेत.
लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर वैभव नाईक यांची चौकशी झाली. लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकाकडून आमदार नाईक यांची चौकशी केली.
दरम्यान 12 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही वैभव नाईक यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यानंतर कोकणातील शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे.