पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) – अनेक प्रलंबित प्रश्नांनी त्रस्त असलेल्या शहरातील सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सरसावले असल्याचे दिसून येत आहे. दसऱ्याच्या दिवशी सकाळी-सकाळी सोसायटीधारकांचे प्रश्न ऐकून घेणाऱ्या पवारांनी आता थेट महापालिकेत येऊन या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
सोसायटीतील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिका-यांची बैठक घेणार असल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात केलेल्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा देखील घेतला जाणार आहे. अजित पवार यांचा कारभार जवळून पाहिल्याने पालिकेतील अधिकाऱ्यांनी याची धास्ती घेतली आहे. बैठकीसाठी फाइली व कागदपत्र गोळा करण्यासाठी अधिकाऱ्यांची एकच धावपळ सुरू असल्याचे पहायला मिळाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांनी सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी थेट अजित पवार यांना आमंत्रित करुन सोसायटीधारकांशी संवाद हा उपक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. आता नागरिकांच्या समस्यांसाठी पवार यांनी स्वत:च तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचा सत्ताकाळ संपताच अजित पवार यांनी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या हाती प्रशासकीय कारभार सोपविला. पवार त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्यामुळे त्यांच्याच आदेशाखाली पालिकेचा कारभार चालायचा. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले आणि तत्कालीन आयुक्त पाटील यांची उलचबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती केली. आता आयुक्त शेखर सिंह हे प्रशासकाची धुरा सांभाळत नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहेत.
सोसायटीधारकांच्या प्रश्नांचा उद्रेक झाल्याने त्याची दखल अजित पवार यांना घ्यावी लागली आहे. सोसायटीधारकांच्या समस्या का सुटल्या नाहीत, याचा आढावा घेण्यासाठी पवार कोणत्याही क्षणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती समजते. सोसायट्यांमधील पाणी टंचाई, ओला सुका कचरा उचलणे, अंतर्गत रस्त्यांची सफाई आदी प्रश्नांवर पवार अधिका-यांची कानउघडणी करणार असल्याचे समजते. त्यासाठी फाइली आणि कागदपत्र गोळा करण्यासाठी पालिकेत अधिकाऱ्यांची एकच धावपळ सुरू होती.
बैठकीसंदर्भात कमालीची गुप्तता
नेते अजित पवार हे सोसायटीतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेत येणार असल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कोणत्याही प्रकारचा राजकीय स्टंट न करता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला अधिका-यांची बैठक घ्यायची असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात येऊ नये, असे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आल्याचे एका राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याने सांगितले. मात्र, अजित पवार हे कोणत्याही क्षणी महापालिकेत घेऊन बैठक घेणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.