पुणे, दि. 2 – चांदणी चौकात आता 14 मीटर लांब आणि 36 मीटर रुंदीचा असा चौपदरी पूल उभारण्यात येणार आहे. प्राधिकरणाकडून महामार्ग रुंदीकरण आणि सेवा रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर महामार्गावर आणखी चार लेन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत होणार आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे.
नव्या उड्डाणपूल प्रकल्पाचे सध्या 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांमध्ये जुन्या पुलाला पर्यायी पूल उभारण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. कात्रज-देहुरोड बायपास रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट वाहने धावत आहेत. या रस्त्याची मूळ क्षमता 98 हजार वाहनांची (प्रति/कार युनिट) असून, येथून प्रत्यक्षात 1 लाख 60 हजार वाहनांची वाहतूक होते.
टेकडीही फोडावी लागणार
पूल पाडल्यामुळे आता लगतची टेकडीही फोडण्यात येणार आहे. तेथे कठीण दगड असल्याने टेकडी फोडण्यास वेळ लागतो. त्यासाठी मर्यादित क्षमतेचा सुरुंग लावण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर केले जाणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यांत्रिक बळही होते सज्ज
पूल पाडल्यानंतर रस्ता खुला करण्यासाठी एनएचएआयतर्फे 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीनच्या मदतीने राडारोडा उचलण्यात आला. त्यामध्ये सुरवातीला राडारोडा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तर काही राडारोडा टिप्परच्या मदतीने चौकात अन्यत्र असलेल्या मोकळ्या जागेत टाकण्याचे काम सुरू झाले. चौकात 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टॅंकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी सकाळपर्यंत कार्यरत होते.