प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 – विना परवानगी फिरती उपहारगृहे अर्थात मोबाइल कॅन्टीनवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. याबाबत दैनिक “प्रभात’ने दि. 28 जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर खुद्द मुख्यमंत्र्यांनी या विषयाची दखल घेतली आहे.
राज्यात सर्वत्र वाहनांमध्ये बदल करून फिरती उपहारगृहे बेकायदा सुरू असल्याने सुरक्षिततेचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले असून शासनाने या व्यवसायाचे धोरण निश्चित करून हा व्यवसाय अधिकृत झाल्यास रोजगार उपलब्ध होऊन शासनाला महसूल मिळू शकतो. याबाबतचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या सूचना दिल्या आहेत.
मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 41(4) अन्वये केंद्र शासन अधिसूचना 1248(ई) नुसार अशा वाहनांची नोंदणी मोबाइल कॅन्टीन म्हणून परिवहन संवर्गात करण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे तपासणी करून वाहन नोंदणी करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. परिवहन आयुक्त
कार्यालयाकडून फिरते उपहारगृह यांच्या तपासणीसाठी वाहतूक नियंत्रक विभाग, अतिक्रमण नियंत्रण विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागांशी समन्वय साधून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई
करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत..