नवी दिल्ली – बनावट पासपोर्ट आणि व्हिसा उपलब्ध करून देणारे एक रॅकेट दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंडला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. आतापर्यंत 325 बनावट पासपोर्ट आणि तब्बल 1,200 बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहेत, असे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पोलीस उपायुक्त तनू शर्मा यांनी सांगितले.
या प्रकरणाचा मास्टरमाईंड झकीर युसुफ शेख याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. झकीर याने बऱ्याच मराठी वेबसिरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका प्रवाशाचाही समावेश आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
यासंदर्भात अटक केलेल्या व्यक्तींकडून 325 बनावट पासपोर्ट आणि 175 बनावट व्हिसा ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, चीन आणि युरोपातील अन्य देशांच्या विहिसांचा समावेश आहे. याशिवाय 77 बायो पेजेस, 12 प्रिंटर, पॉलिमर स्टॅम्प मशिन. अल्ट्राव्हायोलेट लाईट मशिन देखील ताब्यात घेण्यात आले आहे. वेगवेगळ्या देशांच्या व्यक्तींचे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ. इमिग्रेशन आणि विमानतळ अधिकाऱ्यांचे 1,200 रबरी शिक्के देखील ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रवाशांना या अवैध पासपोर्ट आणि व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेत घुसवले जात होते.
झकीर हे रॅकेट मुंबईतून चालवत असे. तर अटक करण्यात आलेला नारायण भाई नावाचा व्यक्ती गुजरातमधून हे रॅकेट चालवत असे. हे रॅकेट प्रामुख्याने मुंबई आणि गुजरातमधूनच चालवले जात असे.
कसे उघड झाले प्रकरण
रवी रमेशभाई चौधरी नावाच्या व्यक्तीला या वर्षी जूनमध्ये संयुक्त अरब अमिरातीतून माघारी पाठवण्यात आले होते. त्याच्याकडे नकली पासपोर्ट असल्याचे लक्षात आल्यावर अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली होती. अधिक तपासासाठी त्याला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांच्या स्वादीन करण्यात आले होते. त्याच्याविरोधातील प्रकरण देखील पोलिसांनी दाखल करून घेतले होते. चौकशीदरम्यान रवी याने नारायणभाई, झाकीर युसुफ शेख आणि मुश्ताक या एजंटांची नावे सांगितली होती. हे तिघेही गुजरात आणि मुंबईतील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर केलेल्या तपासात हे रॅकेट उघड झाले होते.