पुणे – तब्बल अडीचशेहून अधिक हेरीटेज वास्तूसह दैदिप्यमान इतिहासाची जोड असलेला शहराचा इतिहास पुन्हा एकदा पुणेकरांसाठी उलगडणार आहे. जुन्या पुण्याची ओळख करून देण्याबरोबरच शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणारा महापालिकेचा ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.
या हेरीटेज वॉकचे उद्घाटन शनिवारवाडा येथे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे व महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याहस्ते करण्यात आले. पथ विभाग प्रमुख व्ही.जी.कुलकर्णी, पाणीपुरवठा प्रमुख अनिरूध्द पावसकर, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, हेरिटेज विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे, इतिहास अभ्यासक अजित आपटे दर आठवड्यात शनिवार व रविवारी सकाळी 7 ते 9 यावेळेत होणाऱ्या हेरिटेज वॉकचे संदीप गोडबोले नेतृत्व करणार आहेत. त्यांच्यासोबत इतिहास तज्ज्ञ व इतिहास अभ्यासकांचा सहभाग राहणार आहे.
दोन तासांच्या या वॉकमध्ये शिवाजी पूल ते महात्मा फुले मंडई या दरम्यानच्या ऐतिहासिक वास्तूंची सखोल माहिती तज्ज्ञ गाईड यांचेमार्फत पर्यटक व नागरिकांना मिळणार आहे. प्रायोगिक स्वरूपात यामधील या पहिल्या प्रकारच्या हेरिटेज वॉकचे नियोजन करण्यात येत असून, आजच्या टूरमध्ये शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवारवाडा, कसबा गणपती, लाल महाल, नानावाडा, जोगेश्वरी दगडूशेठ हलवाई मंदिर, भिडे वाडा, बेलबाग मंदिर, पुणे नगर वाचन, तुळशीबाग, मंडई, विश्रामबागवाडा इ. वास्तू परिसराची व त्या अनुषंगाने शहराच्या इतिहासाची माहिती देण्यात येणार आहे.