मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पटवर्धन हे गिरगावात स्थायिक होते. त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. त्यानंतर कालांतराने ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. मराठी रंगभूमीवरील एक अतिशय विनोदी कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.
मोरुची मावशी हे त्यांचं नाटक खूप गाजले. याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. दरम्यान, त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीसह मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.