प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – बीए 2.75 व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या भरमसाठ वाढली असून, नव्या 79 रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. यांचा समावेश करून, या व्हेरियंटची संख्या आता 199 झाली आहे. तर बीए 4 -5 या व्हेरियंटची लागण झालेले नवे 62 रुग्ण असून त्यांची संख्या आता 258 झाली आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.5 चे 52 आणि बीए.4 चे 10 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए.2.75 व्हेरियंटचे देखील 79 रुग्ण आढळले आहेत. यातील बीए.2.75 चे 8 रुग्ण सोलापूर येथील, तर उर्वरित सर्व रुग्ण पुण्यातील आहेत.
पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाने कळवले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 258 तर बीए. 2.75 रुग्णांची संख्या 199 झाली आहे.
दरम्यान, पुणे शहरात करोनाची नवी बाधितसंख्या नियंत्रणात आहे. दोन आठवड्यांपूर्वी काही प्रमाणात रुग्ण आढळत होते. पण, आता ही संख्या तुरळक असून, अनेकांना लक्षणेदेखील नाहीत.
जिल्हानिहाय बीए. 4 आणि 5 बाधित
पुणे -163, मुंबई -51, ठाणे – 16, रायगड – 7, सांगली-5, नागपूर – 8, पालघर – 4, कोल्हापूर -2.
जिल्हानिहाय बीए.2.75 बाधित
पुणे -127, नागपूर -33, यवतमाळ -12, सोलापूर -8, मुंबई -5, अकोला – 4, ठाणे -3, वाशिम -2, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली – प्रत्येकी 1.