नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि इतर विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. याबरोबरच पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील सद्यस्थितीशी संबंधित संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा यावेळी पुनरुच्चार केला.
या दोन्ही नेत्यांमध्ये विशेषत: कृषी उत्पादने, खते आणि औषध उत्पादनांच्या द्विपक्षीय व्यापाराला आणखी प्रोत्साहन कसे देता येईल यावर विचार विनिमय करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि खाद्यपदार्थ बाजारपेठेच्या स्थितीसह जागतिक समस्यांवर देखील उभय नेत्यांनी चर्चा केली. जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर नियमित सल्लामसलत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान दोन्ही देशांमधील जुने संबंध वाढवण्यासाठी पहिली ‘2+2’ मंत्रीस्तरीय चर्चा झाली. गेल्या काही दशकांमध्ये जगाने अनेक मूलभूत बदल पाहिले आहेत आणि विविध प्रकारची राजकीय समीकरणे उदयास आली. परंतु भारत आणि रशियामधील मैत्री स्थिर राहिली. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हे आंतरराज्य मैत्रीचे एक अद्वितीय आणि विश्वासार्ह मॉडेल आहे, असे त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
या बैठकीपूर्वी भारत आणि रशियाने 2021-31 साठी लष्करी-तांत्रिक सहकार्य व्यवस्थेअंतर्गत इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत 600,000 एके-203 असॉल्ट रायफल्सच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली होती.