पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जर्मनीची स्टार महिला टेनिसपटू अँजेलिका कार्बर व पुरुष एकेरीत क्रोएशियाच्या मार्टिन सिलीच यांनी थाटात दुसरी फेरी गाठली. कार्बरने पोलंडची मानांकित खेळाडू मॅग्देलना फ्रेंच हिचा 2-6, 6-3, 7-5 असा पराभव करत पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्लोव्हाकियाच्या ऍना कॅरोलिना शेमीदोल्वाहने पहिल्या फेरीच्या लढतीत आपल्याच देशाच्या क्रिस्टीना शुकोव्हावर 4-6, 7-6, 6-2 अशी तीन सेटमध्ये मात केली. पुरुष एकेरीत क्रोएशियाच्या मार्टिन सिलीचनेही थाटात पहिली फेरी जिंकत आगेकूच केली. त्याने हंगेरीच्या अतिला ब्राझवर 6-0, 6-1, 6-2 असा सहज विजय मिळवला व दुसरी फेरी गाठली.
जर्मनीच्या आलेक्झांडर ज्वेरेवने ऑस्ट्रियाच्या सेबॅस्टियन ऑफनेरचा 6-2, 6-4, 6-4 असा पराभव केला. क्रेजिकोव्हा या मानांकित खेळाडूला मात्र डीआन पेरीकडून 6-1, 2-6, 3-6 असा पराभव पत्करावा लागला. अन्य लढतीत एस्टेनियाच्या केनेपने मुगुरुजेनचा 2-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.
मुगुरुजेनला या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर्मनीच्या आंद्रेआ पेटकोवीचने ओशेन डॉदीनवर 6-4, 6-2 अशी मात केली. अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू कोको गॉफने कॅनडाच्या रेबेका मारिनोला 7-5, 6-0 असे पराभूत केले.