पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या लढतीत मंगळवारी सनसनाटी निकाल समोर आला. क्रोएशियाचा स्टार टेनिसपटू मॅरिन सिलीच याने रशियाचा मानांकित टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव याच्यावर 6-2, 6-3, 6-2 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली. दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये मिळून मेदवेदेवने 5 वेळा डबल फॉल्ट केले व तिथेच सामना सिलीचच्या बाजूने झुकला.
डेन्मार्कच्या होल्गर रुन याने धक्कादायक निकाल नोंदवताना गतउपविजेत्या स्टेफानोस त्सित्सिपासला पराभूत केले व पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. रुन याने पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित त्सित्सिपासवर 7-5, 3-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. 21 वेळचा ग्रॅंड स्लॅम विजेत्या नदालने चौथ्या फेरीच्या साडेचार तास चाललेल्या लढतीत ऍललिसिमेवर 3-6, 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा विजय मिळवला.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींत स्पेनच्या कार्लोस अल्कराझने कारेन खाचानोव्हला 6-1, 6-4, 6-4 असे पराभूत करत आगेकूच केली. महिला एकेरीत डारिया कासात्किनाने इटलीच्या कॅमिला जियोर्जिला 6-2, 6-2 असे हरवले.