नवी दिल्ली- हॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना सेवा शुल्क म्हणजे सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक नाही. मात्र हॉटेल चालक ग्राहकाकडून सर्रास सेवा शुल्क घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दोन जून रोजी हॉटेल चालकांची बैठक बोलावली आहे.
यासंदर्भात वृत्त माध्यमात वृत येण्याबरोबरच ग्राहकाकडून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आम्ही नॅशनल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले. ग्राहकांना सेवा शुल्क देण्याचे बंधन नाही. मात्र त्यांनी स्वतः होऊन दिले तर घेता येते. मात्र देशातील अनेक हॉटेल चालकांनी सेवा शुल्क बंधनकारक केले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हॉटेल चालकांच्या संघटनेला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. हे सेवा शुल्क केवळ बंधनकारक नाही तर त्याची रक्कम अनेकदा भली मोठी असते. हे सेवा शुल्क बंधनकारक असल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल करण्याचे प्रकार घडत आहेत. जे ग्राहक सेवा शुल्क देण्यास नकार देतील त्यांना त्रास दिल्याच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल 2017 मध्ये या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यामध्ये सेवा शुल्क बंधनकारक नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
एखादा ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो सेवा शुल्क देणार आहे असे गृहीत धरता येणार नाही. मात्र त्या मार्गदर्शक सूचना इतक्या स्पष्ट असूनही ग्राहकांकडून सेवा शुल्क उकळले जात आहे. यासंदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करून शुल्क लावणे अयोग्य व्यवहार ठरते याची जाणीव दोन जून रोजी हॉटेल चालकांच्या संघटनेला करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.