नवी दिल्ली – देशात दिवसेंदिवस करोनाची प्रकरणे वाढत आहेत. झपाट्याने वाढणारी करोनाची प्रकरणे पाहून प्रशासन आणि लोक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 377 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, या कालावधीत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या या नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर आता हा आकडा 4 कोटी 30 लाख 72 हजार 176 वर पोहोचला आहे. यासह देशभरात या साथीच्या आजाराने मृतांची संख्या 5 लाख 23 हजार 753 वर पोहोचली आहे.
देशातील सक्रिय करोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 801 वर पोहचली आहे. गुरुवारच्या तुलनेत 74 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत, तर सक्रिय प्रकरणांमध्ये 821 ची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 30 हजार 622 लोक या साथीच्या आजारातून बरे झाले आहेत.