पुणे – वार्षिक योजनेमधील कामांसह विविध बिलांची देयके देण्यासाठी जिल्हा परिषदेत आज लगीनघाई दिसून आली. आज, (31 मार्च) रात्री उशिरापर्यंत 17 हजार कामांच्या बिल जिल्हा परिषदेकडून अदा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाण बिल अदा करण्यात आली. यामध्ये सामान्य प्रशासन विभागासह महिला व बालकल्याण, स्वच्छता व पाणी, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन यासह अन्य विभागातील खर्च जवळपास 100 टक्के झाला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना पीएमएफएस प्रणाली लागू केल्यामुळे 31 मार्चला रात्री बारा वाजेपर्यंत वार्षिक योजनांमधील कामे पूर्ण करून त्यांची बिले अदा करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आपल्या सरकारी कार्यालयांमध्ये मागील आठ दिवसांपासून गर्दी वाढली होती. कामे पूर्ण व्हावे, बिलाची रक्कम तत्काळ देण्यासाठी शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशीही कार्यलये सुरू ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी येणारा ताण काहीसा कमी झाला तरी 31 मार्चलारात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेत देयक देण्याची घाईगडबड सुरू होती.
जिल्हा बॅंकेचीही लगबग…
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे जिल्हा परिषदेडून 250 कोटींची बिले पाठविण्यात आली. मात्र, त्यातील 50 कोटीच त्यांच्याकडून देण्यात आले. त्यामुळे 200 कोटी मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेला थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जावे लागले. त्यानंतर बॅंकेकडून रात्री उशिरापर्यंत बिलाची रक्कम पाठविण्याबाबत प्रक्रिया सुरू होती. उर्वरित 200 कोटींपैकी 160 ते 170 कोटी रकमेची बिले तयार होती, ती रक्कम मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची गडबड सुरू होती. दरम्यान, पीएमएफएस वारंवार बंद पडत असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. या अडचणींची मुकाबला करत अधिकाऱ्यांनी एक हजारांचा टप्पा पार केला.