लखनौ – कोणत्याही पक्षाकडून मिळालेली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव आपण स्वीकारणार नाही, असे बसपा नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. जर उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले तर आपल्याला राष्ट्रपती केले जाईल, असा अपप्रचार संघ आणि भाजपच्यावतीने करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणूकीतील पराभवाच्या कारणांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे स्पष्टिकरण दिले. आपण कांशीराम यांच्या पक्क्या अनुयायी आहोत. कांशीराम यांनीही पूर्वी राष्ट्रपतीपदाला नकार दिला होता, असा मायावतींनी सांगितले.
राष्ट्रपतीपद स्वीकारल्याने आमच्या पक्षाचा शेवट होईल. हे माहित असताना हा प्रस्ताव कसा स्वीकारला जाईल. त्यामुळे पक्षाच्या हिताचा आणि चळवळीच्या हिताचा विचार करून आपण राष्ट्रपती पद स्वीकारणार नाही, हे बसपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असे मायावती म्हणाल्या,
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक होणार आहे.