बीड : नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायत निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा जल्लोष करण्यात येत असताना दुसरीकडे केजमध्ये राष्ट्रवादीचा नवनिर्वाचित नगरसेवकच चक्क चंदन तस्कर निघाला आहे. चंदन तस्करी प्रकरणात केज नगरपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बीडच्या केज नगरपंचायतमधील एका नवनिर्वाचित नगरसेवकाविरोधात चंदन तस्करी प्रकरणात आंबेजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदन तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जाधव असे नगरसेवकाचे नाव आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेतचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
आंबेजोगाई तालुक्यातील वाघाळा शिवारात पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी वरून बाळासाहेब दत्तात्रय जाधव त्याच्या साथीदारांसह वाघाळा शिवारात आंबासाखर कारखाना जवळील देवराव कुंडकर यांच्या शेतातील पत्र्याचे शेड मध्ये चंदनाच्या झाडाची चोरी करून झाड व झाडाचे खोड तपासून गाभा काढत आहे अशी माहिती मिळाली.
यावरून प्रत्यक्ष कारवाई केली असता 27 किलो चंदनाचा गाभा पकडला त्याचे किंमत 67500 असून या प्रकरणात तिघा देवराव भानुदास कुंडकर, बाळासाहेब दत्तात्रेय जाधव, सतीश या तीन आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.