पुणे – करोनाची दुसरी लाट शिखरावर असताना शहरातील संसर्ग दर 23.9 टक्के होता. मात्र, तोच दर आता 29.5 टक्के आहे. संसर्ग दर अधिक असूनही ऑक्सिजन पुरवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत 14.1 टक्के होती. ती अवघी 0.58 टक्क्यांवर आहे.
व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या 1.8 टक्क्यांवरून 0.01 टक्के इतकी कमी झाली आहे. वेगाने झालेले लसीकरण आणि ओमायक्रॉन आवृत्तीचा संसर्ग यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये बाधित संख्या वाढत असली, तरी प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे.