दुबई – आशिया करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताच्या युवा संघाने सोमवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर 4 गडी राखून मात केली. या विजयाच्या जोरावर भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार यश धौलने नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. अफगाणिस्तानकडून इजाज अहमद अहमदझाईने 86 तर, कर्णधार सुलीमन सफीने 73 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 6 गडी गमावून 49 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर 262 धावा करत हा सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताकडून सलामीवीर हरनूरसिंगने 65 धावांची खेळी करताना अंगक्रीश रघुवंशीच्या साथीत संघाला शतकी सलामी दिली. रघुवंशी 35 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ हरनूरही परतला. त्यानंतर यश धौल 26, निशांत संधूने 19 धावा करत विजयाची संधी निर्माण केली.
मात्र, हे दोघेही बाद झाल्यावर राज बावाने कौशल तांबेसह जबाबदारीने फलंदाजी केली. बावाने नाबाद 43 तर तांबेने नाबाद 35 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला. या जोडीने सातव्या गड्यासाठी 65 धावांची अखंडीत भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक – अफगाणिस्तान – 50 षटकांत 4 बाद 259 धावा. (इजाज अहमद अहमदझाई 86, सुलीमन सफी 73, कौशल तांबे 1-25, राज बावा 1-66). भारत – 48.2 षटकांत 6 बाद 262 धावा. (हरनूरसिंग 65, अंगक्रीश रघुवंशी 35, राज बावा नाबाद 43, कौशल तांबे नाबाद 35, नूर अहमद 4-43).