मुंबई – खासगी क्षेत्रातील आरबीएल बॅंकची भांडवली आणि वित्तीय स्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व बॅंकेने केले आहे. या बॅंकेच्या भांडवली आणि वित्तीय स्थितीबाबत काही ठिकाणी शंका व्यक्त केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बॅंकेने केलेल्या स्पष्टीकरणाला महत्त्व देण्यात येत आहे.
आज रिझर्व बॅंकेने या संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार या बॅंकेची परिस्थिती समाधानकारक असल्यामुळे अफवाच्या आधारावर बॅंकेच्या ग्राहकांनी ठेवी परत घेण्याची गरज नाही असे सांगण्यात आले आहे. आरबीएल बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विश्ववीर अहुजा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यानंतर बॅंकेने तात्काळ व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राजीव अहुजा यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर रिझर्व बॅंकेने योगेश के दयाल यांची आरबीएल बॅंकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
रिझर्व बॅंकेने म्हटले आहे की, आम्ही बॅंकेचा सहामाहीचा ताळेबंद पाहीला. या ताळेबंदावरुन बॅंकेची भांडवली आणि वित्तीय परिस्थिती ठीक आहे. बॅंकेकडे पुरेसे भांडवल आहे. त्याचबरोबर बॅंकेची कर्ज वाटपाची क्षमता अबाधित आहे. रिझर्व बॅंकेने आरबीएल बॅंकेवरवर आपला एक संचालक नेमला आहे. हा नियमीत कामकाजाचा भाग आहे. अनेकदा रिझर्व बॅंकेला परिस्थितीनुसार अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात.
आरबीएल बॅंकेचा शेअर कोसळला
खासगी क्षेत्रातील आरबीएल बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक विश्ववीर आहुजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी या बॅंकेच्या शेअरच्या भावामध्ये 18 टक्क्यांची घट झाली. दरम्यानच्या काळामध्ये बॅंकेने नव्या व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती केली आहे. रिझर्व बॅंकेनेही बॅंकेवर संचालक नेमला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारावर या बॅंकेचा शहर 18 टक्क्यांनी कमी होऊन 141 रुपये 60 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला. बॅंकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याच्या अफवा पसरल्या असतानाच या बॅंकेच्या शेअरची विक्री केली असल्याचे दिसून आले. आगामी काळातही गुंतवणूकदारांचे या बॅंकेच्या शेअरकडे लक्ष राहण्याची शक्यता आहे.