नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंक आगामी काळात अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबाबत आशावादी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनची संसर्ग क्षमता जास्त असली तरी संहारक क्षमता कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. परिणामी भारतीय बाजारातही खरेदी होऊन सोमवारी निर्देशांक उंचावले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 295 अंकांनी वाढून 57,420 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी म्हणजे 0.49 टक्क्यांनी वाढून 17,086 अंकांवर बंद झाला.
टेक महिंद्रा कंपनीसह, डॉक्टर रेड्डीज, पावर ग्रिड, कोटक बॅंक, सनफार्मा, आयसीआयसीआय बॅंक, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र इंडसइंड बॅंक, मारुती, एअरटेल या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
ओमायक्रॉनची संहारक क्षमता कमी असल्यामुळे आशियाई शेअर बाजारातून सकाळी सकारात्मक संदेश आले. रिझर्व बॅंकेच्या पतधोरण समितीचे इतिवृत्त जाहीर झाले आहे. या वृत्तातील माहितीनुसार लवकरच खासगी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांमध्ये विकास दर चांगला वाढेल असे पतधोरण समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे. यामुळे गुंतवणूकदार आशावादी झाले आणि त्यांनी खरेदी केली असल्याचे दिसून आले.
आज झालेल्या खरेदीचा फायदा आरोग्य, भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू, बॅंकिंग, वित्त, रिऍल्टी, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांना झाला. मात्र दूरसंचार, ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक घसरले. मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये 0.44 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
निफ्टीला 16,800 वर मजबूत आधार
फाइव पैसा डॉट कॉमचे संशोधक रुचित जैन यांनी सांगितले की, शेअर बाजार निर्देशांक पुन्हा मजबुतीने वाटचाल करण्याच्या परिस्थितीत आहेत. निफ्टीला 16,800 अंकांवर चांगला आधार आहे. तर निफ्टीला 17,200 ते 17,300 अंकांवर काही अडथळे आहेत. निफ्टीने ही पातळी ओलांडल्यानंतर निफ्टी पुन्हा वेगाने वाटचाल करू शकेल. दरम्यानच्या काळामध्ये गुंतवणूकदारांनी देशातील आणि परदेशातील परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून सावध व्यवहार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.