अबुधाबी – श्रीलंका संघाने वेस्ट इंडीजचा 21 धावांनी पराभव केला. अर्थात या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचे आव्हान संपलेले असल्याने या विजयामुळे त्यांच्या स्थितीत कोणताही फरक पडणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सामन्यात नाबाद शेमरन हेटमायरने 81 धावांची आक्रमक खेळी केल्यानंतरही वेस्ट इंडीजचा संघही या पराभवामुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा डाव 20 षटकांत 8 बाद 169 धावांवर रोखला गेला. ख्रिस गेल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. भरात असलेला इव्हान लेविस व रोस्टन चेस साफ अपयशी ठरले. एका बाजूने निकोलस पूरनने किल्ला लढवला. मात्र, त्यानेही अनावश्यक फटका मारत आपली विकेट बहाल केली. त्याने 46 धावांच्या खेळीत 34 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला.
एका बाजूने शेमरन हेटमायरने सरस फलंदाजी केली. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजावर हल्ला चढवताना अर्धशतक फटकावले. त्याने आपल्या नाबाद 81 धावांच्या खेळीत 54 चेंडूत 8 चौकार व 4 षटकार फटकावले. मात्र, त्याला समोरून योग्य साथ लाभली नाही व त्यांना हा सामना गमवावा लागला. श्रीलंकेकडून बुनीरा फर्नांडो, वनिंदू हसरंगा व चामिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दासून शनाका व दुष्मंत चमीरा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सलामीवीर पाथूम निसांका व चरिथा असालंका यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत 20 षटकांत 3 गडी गमावून 189 धावा केल्या.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर पाथून निसांकाने कुशल परेराच्या साथीत संघाला 42 धावांची सलामी दिली. आंद्रे रसेलने परेराला बाद करत वेस्ट इंडीजला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या असालंकाने निसांकाला सुरेख साथ दिली व संघाचा डावही सावरला. दरम्यान निसांकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 41 चेंडूत 5 चौकारांसह 51 धावांची खेळी केली. मात्र, धावांचा वेग वाढवताना तो बाद झाला. असालंकाने अर्धशतक साकार केले. त्यानंतर त्याने कर्णधार दासून शनाकाच्या साथीत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.
डावाच्या 16 व्या षटकांत 41 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार फटकावताना 68 धावाची खेळी केली. तो बाद झाल्यावर कर्णधार शनाकाने नाबाद 25 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 14 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावले. वेस्ट इंडीजकडून आंद्रे रसेलने 2 तर ड्वेन ब्राव्होने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका – 20 षटकांत 3 बाद 189 धावा. (चरिता आसालंका 68, पाथुन नीसांका 51, कुशल परेरा 29, दासून शनाका नाबाद 25, चामिरा करुणारत्ने नाबाद 3, आंद्रे रसेल 2-33, ड्वेन ब्राव्हो 1-42). वेस्ट इंडीज – 20 षटकांत 8 बाद 169 धावा. (निकोलस पूरन 46, शेमरन हेटमायर नाबाद 81, अकिल हुसेन नाबाद 1, वनिंदू हसरंगा 2-19, बुनीरा फर्नांडो 2-24, चामिका करुणारत्ने 2-43, दासून शनाका 1-18, दुष्मंत चमीरा 1-41).