Lahiru Thirimanne Accident : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याला गुरुवारी अनुराधापुरा येथे झालेल्या भीषण कार अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो त्याच्या गाडीतून प्रवास करत होता. त्यांची कार समोरून येणाऱ्या वाहनाला धडकली. त्यानंतर त्याला अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अनुराधापुरा हे श्रीलंकेचे प्रमुख शहर आहे जे राष्ट्रीय राजधानी कोलंबोपासून 205 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
थिरिमाने याच्यासोबत कारमध्ये आणखी एक प्रवासी होता आणि त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. थिरिमाने सध्या लीजेंड्स क्रिकेटमध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून खेळत आहे आणि फ्रँचायझीने या घटनेबाबत अधिकृत विधान प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘”आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की लाहिरू थिरिमाने आणि त्यांचे कुटुंब मंदिराकडे जात असताना त्यांच्या कारचा किरकोळ अपघात झाला. सुदैवाने, त्यांना निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चांगली गोष्ट अशी आहे की प्राथमिक तपासणीनंतर, ते सर्व सुरक्षित आणि निरोगी असल्याची आम्ही पुष्टी करू शकतो. काळजी करण्यासारखे काहीही नाही. या वेळी आम्हाला सर्वांकडून मिळालेल्या पाठिंब्याचे आम्ही कौतुक करतो. आम्ही त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो आणि थिरिमाने लवकर बरे व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो.
न्यूजवायर वृत्तवाहिनीनुसार, अपघाताच्या वेळी थिरिमाने हा कुटुंबांसह तीर्थ यात्रेवर होता. यावेळी प्रवासादरम्यान पलीकडून येणाऱ्या एका लॉरीवर कार आदळली आणि या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.
रिपोर्टनुसार, “पोलिसांनी सांगितले की, थिरिमाने ज्या कारमधून प्रवास करत होता ती कार दुसऱ्या दिशेने येणाऱ्या एका लॉरीला धडकली. सकाळी 7.45 वाजता हा अपघात झाला.
चाहत्यांना झाली ऋषभ पंतची आठवण….
घराच्या दिशेने जात असताना 14 मार्च रोजी त्याचा अपघात झाल्याची माहिती श्रीलंकन मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर सोशल मीडियावर त्याच्या गाडीचे अनेक हादरवणारे फोटो समोर आले आहेत. अपघातग्रस्त गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गाडीच्या अवस्थेवरून अपघात किती भयंकर होता, याचा अंदाज लावता येतो. पण यात चांगली गोष्ट म्हणजे थिरिमानेला गंभीर दुखापत झालेली नाही. लाहिरू थिरिमानेचा कार अपघात पाहून क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतची आठवण झाली. 30 डिसेंबर 2022 रोजी पंतचा भीषण कार अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती.
लाहिरू थिरिमानेची कारकिर्द….
लाहिरू थिरिमानेने 2010 साली भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. तो एक दिवसीय सामना होता. एका वर्षानंतर म्हणजेच 201 मध्ये त्याचे कसोटी पदार्पण झाले. थिरिमानेने आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत श्रीलंकेसाठी 44 कसोटी सामने, 127 एकदिवसीय सामने आणि 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तीन T20 विश्वचषकांमध्ये तो श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. 2014 मध्ये चॅम्पियन झालेल्या श्रीलंकेच्या संघाचाही तो भाग होता. जुलै 2023 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.