पुणे(प्रतिनिधी) – सोन्याचा होलसेल व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याचे खासगी ट्रॅव्हलमधून 81 लाखाचे दागिने आणी 18 लाखाची रोकड चोरणाऱ्या दोघांना ग्रामिण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 37 लाख 72 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
मारूती राजाराम पिटेकर ( रा.माळंगी, ता.कर्जत, जि.अहमदनगर, ) आनंता लक्ष्मण धांडे ( रा.वालवड, ता.कर्जत, जि.अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी कमलेश सुकनराज राठोड हे हुबळी ते मुंबई असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. त्यांचे सोबतच्या सीटवर दोघे आरोपी त्यांच्या आणखी एका साथीदारासमवेत सह प्रवाशी म्हणून होते. प्रवासा दरम्यान त्यांची रोख रक्कम 18 लाख रूपये व 81 लाख 24 हजार रूपये किंमतीचे 2,110 ग्रॅम वजनाचे 18 करेटचे सोन्याचे वेगवेगळे दागीने असलेली खाकी रंगाची पाठीवर अडकविण्याची बॅग चोरण्यात आली होती.
अशी करत होते चोरी….
आरोपींचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय असून ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते होलसेल सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना हेरत असत. संबंधीत व्यापारी ज्या लॉजमध्ये रहात असे त्याच्या शेजारील रुमबुक करत असत. संधी मिळाली तर रुममधून बॅग पळवत अन्यथा तो प्रवास करत असताना प्रवासात संधी साधत असत.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील याचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे आणी पोलीस नाईक मदने यांनी फिर्यादी हे ज्या ठिकाणी सोने देण्यासाठी हुबळी येथे गेले होते, तेथे जावून तपास केला . तेव्हा तांत्रीक तपासाच्या आधारे पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा सापडला. त्यानूसार कर्जत(अहमदनगर) आणी कुडूवाडी(सोलापूर) या ठिकाणी पथके पाठवून स्थानिक पोलीसांच्या आधारे आरोपींना अटक केली.
त्यांचेकडून गुन्हयातील एकुण 37 लाख 72 हजार 222 रूपये किमतीचे सोन्याचे कानातील रिंगा, झुमके, नेकलेस, राणीहार अशा प्रकारचे वेगवेगळे दागीने हस्तगत केले.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्येही गुन्हे दाखल आहेत.