अयोध्या – आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज अयोध्येला भेट देऊन रामजन्मभूमी स्थळावर दर्शन घेतले. दिल्ली सरकारने नागरीकांना मोफत तीर्थ यात्रा योजना सुरू केली असून या तीर्थस्थळांच्या यादीत अयोध्येचाही समावेश केला जाईल अशी घोषणा केजरीवालांनी यावेळी केली.
मी भाग्यवान होतो म्हणून मला रामलल्लांचे दर्शन घडले. असे भाग्य अधिकाधिक लोकांना लाभावे म्हणून मी माझ्या क्षमतेत जे काही करता येणे शक्य आहे ते करणार आहे असेही केजरीवालांनी यावेळी नमूद केले.
माझ्या देशातील सर्व नागरीक सुखी होवोत, करोनाचे संकट कायमचे टळो, आणि येत्या काही काळात देशाचा सर्वांगिण विकास होवो अशी आपण रामलल्लांकडे प्रार्थना केली असे त्यांनी नमूद केले. दिल्लीकरांना एसी रेल्वेतून, एसी हॉटेल मध्ये राहण्याच्या सुविधेसह अयोध्येचा मोफत प्रवास करता येईल अशी योजना दिल्ली सरकारच्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतच संमत केली जाईल अशी माहितीही केजरीवालांनी यावेळी दिली.
दिल्ली सरकारने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत तीर्थ यात्रा योजना दिल्लीत सुरू केली आहे. त्यात दरवर्षी 77 हजार ज्येष्ठ नागरीकांना मोफत यात्रांचा लाभ घेता येतो. 60 वर्षांवरील नागरीक यासाठी पात्र ठरतात. मंदिर उभारणीसाठी आपणही देणगी दिली आहे तथापि अशा देणग्या गुप्त ठेवलेल्याच बऱ्या असे त्यांनी आज पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.