व्यक्तिगत महत्वाकांक्षेपेक्षा पक्ष मजबूती महत्वाची; सोनियांची कॉंग्रेस मधील सहकाऱ्यांना सूचना

नवी दिल्ली, – कॉंग्रेस मधील सहकाऱ्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेपेक्षा पक्षाच्या मजबूतीसाठी अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. पक्षात अधिक शिस्त आणि ऐक्‍य असण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला आहे.

पुढील वर्षी देशातील पाच महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची रणनिती ठरवण्यासाठी सोनियांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची आज बैठक झाली. त्या बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली. त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारच्या आततायी भूमिकेमुळे देशातील अनेक जण पोळले असून त्याचा फटका बसलेल्यांच्या हितासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुप्पट शक्तीने लढा दिला पाहिजे.

पक्षाचा संदेश तळागाळात पोहोचवण्यासाठी आपण कमी पडतो आहोत त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. या बैठकीला पक्षाचे नेते राहुल गांधी हेही उपस्थित होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी आणि संबंधीत राज्यांमध्ये काम करण्यासाठी नेमण्यात आलेले सरचिटणीस आणि अन्य नेतेही उपस्थित होते.

कॉंग्रेस मुख्यालयात ही बैठक झाली. येत्या 1 नोव्हेंबर पासून कॉंग्रेसची सदस्य नोंदणी सुरू होत आहे. ती 31 मार्च पर्यंत चालणार आहे. त्याचा तपशीलही या बैठकीत निश्‍चीत करण्यात आला. पक्ष कार्यकर्त्यांना व्यापक प्रमाणात प्रशिक्षण देण्याची गरज असून त्याचे काम सर्वच पातळ्यांवर प्राधान्याने हाती घेतले जावे अशी सूचनाही सोनिया गांधी यांनी केली.

भाजप आणि संघाचा खोटेपणा उघडा पाडला तरच आपल्याला ही निवडणुकीची लढाई जिंकता येणार आहे त्यामुळे त्यादृष्टीने आपले कार्यकर्ते तयार करावे लागतील अशी सूचनाही सोनियांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.