पुणे – शहरातील 8 वी ते 10 वीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दोन दिवस आधी काढले. मात्र, त्याचवेळी महापालिका शाळांच्या शिक्षकांना करोना ड्युटीतून मुक्त करण्याचे आदेशच न काढल्याने पालिकेच्या काही शाळा शिक्षकाविनाच भरल्याचे समोर आले आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर दोन दिवसांनी महापालिकेने तातडीचे आदेश काढत या शिक्षकांच्या ड्युटी रद्द करून त्यांना अध्यापनाच्या कामासासाठी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे स्मार्ट महापालिका म्हणून मिरविणाऱ्या महापालिकेच्या शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
राज्य शासनाने 4 ऑक्टोबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी 2 ऑक्टोबर रोजीच शहरातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानुसार, शाळाही सुरू झाल्या.
मात्र, या शाळांमधील अनेक शिक्षकांना करोना नियंत्रणाचे काम देण्यात आले आहे. त्यात, युनिव्हर्सल पास देण्यासाठी शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक यासह स्मार्ट सिटीच्या सिंहगड रस्ता येथील कार्यालय आणि शहरात अनेक लसीकरण केंद्रांवर शिक्षकांना नियुक्त केले आहे. त्यातच, करोनाचे काम अर्धवट सोडल्यास कारवाईची शक्यता असल्याने या शिक्षकांनी शाळा सुरू झाल्यानंतर करोनाचेच काम केले.
त्यामुळे शिक्षक इतर कामांत असल्याचे निदर्शनास येताच शिक्षण विभागाकडून तातडीने महापालिका प्रशासनास प्रस्ताव पाठवित या शिक्षकांना अध्यापनाच्या कामासाठी कार्यमुक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी 6 ऑक्टोबरला या शिक्षकांना करोनाच्या कामातून मुक्त करत शालेय कामासाठी तातडीने नियुक्त होण्याचे आदेश दिले. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेच्या विभागांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले.
शिक्षक, मुख्याध्यापकांचा होता समावेश
करोना नियंत्रणाच्या कामात ज्या शिक्षकांकडे 8 वी ते 12 वीचे अध्यापन तसेच शाळेच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी आहे, त्यांचाच समावेश होता. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ उडाला. यापूर्वी करोना नियंत्रणाच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्या तसेच काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक तसेच मुख्याध्यापकांनी पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारली.