पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी 2011 ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार प्रभागांची रचना केली जाणार आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या वाढली असून ती 27 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, 2011 च्या जणगणनेनुसारच प्रभागांची रचना केली जाणार असल्याने लोकसंख्या वाढली असली तरी नगरसेवकांची संख्या मात्र तेवढीच राहणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 ला झाली. त्यानंतर 26 मार्च 1986 पर्यंत पालिकेवर प्रशासक होते. 2 मार्च 1986 साली 60 वॉर्डसाठी पालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर 1992 व 97 ला एक वॉर्ड याप्रमाणे निवडणूक झाली. फेब्रुवारी 2002 मध्ये 3 सदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या यावेळी 35 प्रभाग होते.
त्यानंतर दोन व चार सदस्य पद्धतीने निवडणूका झाल्या. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 2011 ची जनगणना झाली नाही. त्यामुळे 10 वर्ष जुन्या जनगणनेनुसार फेब्रुवारी 2022 ची निवडणुक होणार आहे. 2011 साली शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 359 होती. त्यामध्ये पुरुष 9 लाख 45 हजार 943 व महिलांची संख्या 7 लाख 83 हजार 406 होती. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या सुमारे 10 लाखांने वाढून 27 लाखांच्या जवळ गेली आहे.
करोनामुळे 2021 ची जनगणना झाली नाही, त्यामुळे 2011 च्या जनगणनेनुसारच प्रभागांची रचना करण्यास सुरूवात झाली आहे. जुन्या लोकसंख्येच्या आधारे रचना होणार असल्याने लोकसंख्या वाढूनही नगरसेवकांची संख्या 128 च राहणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये 43 प्रभाग होणार आहेत. त्यामध्ये 42 प्रभाग हे तीन सदस्यांचे असतील तर एक प्रभाग हा दोन सदस्यांचा असणार आहे.
मागील निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग होता. आता तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यास राज्य मंत्रीमंडळात निर्णय झाला आहे. त्यानुसार, शहरात प्रभाग रचना करण्यात येणार आहे. एका प्रभागामध्ये सुमारे 40 हजार मतदार असणार आहे. हे 40 हजार मतदार प्रभागातील तीन नगरसेवक कोण होणार हे ठरवणार आहे.
राज्य मंत्रिमंडळामध्ये तीन सदस्यांचा प्रभाग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप याबाबत महापालिका निवडणूक विभागाला आदेश प्राप्त झाला नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला ठराव राज्य निवडणूक आयोगाकडे जाईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग करण्याबाबत सूचना प्राप्त होतील. मात्र, अद्याप आदेश आला नसल्याने प्रभाग रचनेला सुरुवात करण्यात आली नाही. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेचा निवडणूक विभाग व प्रशासन सज्ज आहे.
– बाळासाहेब खांडेकर,सहायक आयुक्त, निवडणूक विभाग.