पुणे-मुंबई महामार्ग रोखला

शेतकरी कायदे, महागाई, बेरोजगारी विरोधात कॉंग्रेसने

लोणावळा – केंद्र शासनाने शेतकरी कायदे, देशात इंधन, गॅस व जीवनावश्‍यक वस्तूंची झालेली भाववाढ, झपाट्याने वाढत असलेली बेरोजगारी व सरकारी अस्थापनांचे सुरू असलेले खासगीकरण याविरोधात सोमवारी (दि. 27) कॉंग्रेसने देशभरात पुकारलेल्या “भारत बंद’ला लोणावळा शहर कॉंग्रेसने पाठिंबा देत पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच गवळीनाका पूर्णतः बंद तर उर्वरित बाजारात अंशतः बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

सकाळी सव्वाअकरा वाजता कुमार चौकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर येत केंद्र शासनाच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. भारत हा लोकशाही प्रधान देत असताना भाजपा व नरेंद्र मोदी देशात हुकूमशाही पद्घतीने वागत आहेत. गेल्या अकरा महिन्यांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले शेतकरी केंद्राने केलेल्या शेतकरी कायद्यांतील तीन जुलमी कायदे रद्द करा म्हणून आंदोलन केले.

या आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. पेट्रोल, डिझेलचे व घरगुती गॅसचे दर भडकले असताना व सर्वसामान्य नागरिक यामध्ये पुरता भरडलेला असताना त्यावर केंद्राचे नियंत्रण राहिलेले नाही.

देशातील युवकांना दोन कोटी रोजगार दरवर्षी देण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती, प्रत्यक्षात दरवर्षी कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत. सरकारी अस्थापनांचे खासगीकरण सुरू आहे. नागरिक बेरोजगार होत असून, नोकरीची हमी राहिलेली नसताना मोदी सरकार याविरोधात भूमिका घेत असल्याने या सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस निखिल कविश्‍वर, लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड व पदाधिकारी यांनी केली.

लोणावळा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस निखिल कविश्‍वर, महिलाध्यक्षा पुष्पा भोकसे, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, नगरसेवक सुधीर शिर्के, नगरसेविका आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, माजी नगराध्यक्षा उषा चौधरी, वसंत भांगरे, नासिर शेख, जंगबहादूर बक्षी, रवी सलोजा, सुबोध खंडेलवाल, बाबुभाई शेख, सुनील मोगरे, जितेंद्र कल्याणजी आदींसह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.