अबुधाबी – गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीनंतर सलामीवीर शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर यांच्या सावध परंतु सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाचा 9 गडी राखून पराभव केला.
विजयासाठी आवश्यक 92 धावा कोलकाताने 10 षटकांत केवळ 1 गडी गमावून पूर्ण केले. कोलकाताच्या डावाची सुरुवात करताना गिल व अय्यर यांनी बेंगळुरूचे गोलंदाज वरचढ ठरणार नाहीत याची काळजी घेतली. या जोडीने दमदार 82 धावांची सलामी दिली. गिल मात्र, अर्धशतक साकार करण्यात अपयशी ठरला.
त्याने 34 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावताना 48 धावा केल्या. त्याला यजुवेंद्र चहलने बाद केले तेव्हा कोलकाता संघाला विजयासाठी केवळ 11 धावांची गरज होती. गिल परतल्यावर आलेल्या आंद्रे रसेल फलंदाजीला आला. मात्र, त्याला संधीच न देता अय्यरने चहलला सलग तीन चौकार फटकावत संघाचा विजय साकार केला. अय्यर 27 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 41 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, मिस्ट्री स्पिनर असे संबोधले जात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीने रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने बेंगळुरूचा डाव अवघ्या 92 धावांत संपवला.
नाणेफेक जिंकत बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या कोहलीला प्रसिद्ध कृष्णाने केवळ 5 धावांवर तंबूत पाठवले.
त्यानंतर देवदत्त पडीक्कल व श्रीकर भरत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉकी फर्गुसन व आंद्रे रसेल यांनी या दोघांचा अडसर दूर केला. पडीक्कलने 20 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 22 तर, श्रीकरने 19 चेंडूत एक चौकाराच्या सहाय्याने 16 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल, सचिन बाबी व वनिंदू हसरंगा यांना चक्रवर्तीने बाद केले.
दुसऱ्या बाजूने मिस्टर 260 असे संबोधले जात असलेल्या एबी डीविलियर्सला रसेलने अप्रतीम यॉर्करवर बाद करत कोलकाताच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर केला. त्यानंतर तळात हर्षल पटेल 12 याचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला धावा जमवता आल्या नाहीत. त्यांचा डाव 19 व्या षटकात 92 धावांवर आटोपला. पूर्ण वीस षटकेही बेंगळुरूला खेळता आली नाहीत. कोलकाताकडून चक्रवर्ती व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. लॉकी फर्गुसनने 2 तर प्रसिध कृष्णाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक :-
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 19 षटकांत सर्वबाद 92 धावा. (देवदत्त पडीक्कल 22, श्रीकर भरत 16, हर्षल पटेल 12, आंद्रे रसेल 3-9, वरुण चक्रवर्ती 3-13, लॉकी फर्गुसन 2-24, प्रसिध कृष्णा 1-24). कोलकाता नाईट रायडर्स – 10 षटकांत 1 बाद 94 धावा. (शुभमन गिल 48, व्यंकटेश अय्यर नाबाद 41, आंद्रे रसेल नाबाद 0, यजुवेंद्र चहल 1-23).